Sunday, 7 June 2015

आठवणी १: कथा २१ ते २५ बद्दल


नमस्कार! आठवण - १ मधील शेवटच्या पांच कथांबद्दल लिहिताना एक पूर्ततेचा आनंद वाटत आहे, घेतलेले व्रताचे उद्यापन होत आहे. नियमितपणे हे सर्व ब्लॉग्स लिहीताना त्यांत सुसूत्रता ठेवणं अगदी सोपं गेलं! वाचकांनो धन्यवाद!

मनस्विनीचे आई-वडील जरी शिवभक्त होते तरी बुद्धीची देवता गणपती यांनाही ते मानत असल्याने दर वर्षी येणाऱ्या गौरी गणपतीची भावपूर्वक पूजा करत असत. लहानपणापासून शिकण्याचे वेड असलेल्या मनस्विनीला या उत्सवाचे महत्त्व तिच्या लहानपणी जरी कळत नव्हते तरी वेदपठण, मंत्र जागर इ. संस्कृत तालबद्ध, लयबद्ध व त्रिपाठी मंत्रघोष आजही तिच्या मनावार पक्का ठसा ठेऊन आहेत. या उत्सवाची माहिती ती 'उत्सव श्री गणेशाचा' कथेत वर्णिते.

'माणूस एक जनावरच' ही कथा, समाज प्रतिष्ठीत असो किंवा रांगडा असो, चालतो एकाच मार्गानं. प्रतिष्ठेच्या नावाखाली छुपा तर रांगडेपणात उघड उघड agenda दिसतो! मनस्विनीच्या अनेकविध नोकऱ्यामध्ये तिलाही विविध प्रकारची माणसं भेटली. त्यांचे विविध रवैय्ये तिने जवळून पाहिले आहेत. पण मुळात धागा एकच - स्त्री, संपत्ती, अधिकाराचा दुरुपयोग! मनस्विनी स्वाभिमानी आहे. ती आपली जिद्द पूर्ण करताना नोकरीची गरज, नोकरीत तिच्याकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा ती निरीक्षणाने जाणते. पण नैतिकतेचा प्रचंड भक्कम पाया असल्यामुळे ती अत्यंत हुशारीनं वागते. अर्थात अतिसज्जन माणसं जशी corporate दुनियेत लांब ठेवली जातात किंवा बांधून ठेवली जातात, याचा अनुभव पूर्णपणे घेते. ही कथा म्हणजे 'सवलत मागणं एक प्रकारची भीकच!' तिच्या मनाची तळमळणारी, टोचणारी, जखमी अवस्था तिच्या लिखाणात यथार्थपणे उतरली आहे.

तिच्यासारखच अनेकांना अभ्यासाचं वेड असतं. हे वेड तिनं 'अभ्यास' कथेत रंगवलं आहे. पोटभरू शिक्षणाचा आणि व्यवहारी ज्ञानाचा अर्थार्थी संबंध नाही तरीही ज्ञान हे ज्ञान असून त्याने व्यक्तीचा विकासाच होतो. ते वाया जात नाही. म्हणून प्रत्येकानं जरूर शिकावं असं मनस्विनी मानते.

आज तिचे आयुष्य एक यशस्वी स्त्री म्हणण्या इतकं परिपूर्ण आहे. कुटुंबात, समाजात ती सर्वांना हवीशी वाटते पण या शतकातील कुटुंबे, जास्त करून मध्यम वर्गीय कुटुंबे, विखुरली आहेत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पैसा कमावण्यासाठी, स्वतःची तरक्की व्हावी म्हणून गरजेची झाली आहे. घर लहान पडतं, पैसे कमी पडतात, भावा भावांच्या कमाईतील तफावत, जबाबदारी टाळण्याची युक्ती, बायका बायकांतील चढाओढ - एक नाही, अनेक कारणं! पण याचा अर्थ त्यांच्यातील प्रेम भावना आटली आहे असे नाही. Skype, Facebook, मोबाईल, आय पॅड एक नाही अनेक मार्गांनी ती कुटुंबे जोडलेलीही आहेत. Thanks इंटरनेट दादा! दुरूनही एकमेकांची विचारपूस करतात, सुख दु:ख जाणून घेतात, अडचणीत मदत करतात. तरीही त्यांचा प्रत्यक्ष सहवास नाही. या सहवासाच्या अभावाने या आपुलकीत काहीतरी 'नक्कीच' कमी आहे. मनस्विनीच्या सर्व अनुभवाने, तिला आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असल्यासारखं वाटतं. सर्व सुखसोयी, आनंद, प्रतिष्ठा जो मिळवता मिळवता माणूस जन्म घालवतो, तो मिळूनही ती 'ने मजसी ने' असे उद्गार काढते. कुठे ने? या पलिकडे की परत मायभूमीकडे - आपणच वाचून पहावे.

कुठल्याही चांगल्या गोष्टीचा आरंभ गणेश पूजेने करतात. आज या पुस्तकाचा शेवट. मग गणेश स्मरण मनस्विनीने का बरं केलं? हाच आठवणी - २ चा शुभारंभ समजावा! लवकरच आठवणींचा पुढील भाग घेऊन येईपर्यंत रामराम करते

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: गणपती बाप्पा मोरया!  

No comments:

Post a Comment