Sunday 24 May 2015

अनुभूति: सद्यस्थितीबद्दल


नमस्कार! कलियुगात पिडलेली माणसं पुढे येणाऱ्या सत्य युगाची, डोळे लावून वाट पहात आहेत. कलियुगात झालेली हानी म्हणजेच खालावलेली नीतीमत्ता, विस्खळलेली समाजरचना, मंदावलेली बुद्धी इ. यांची जाण मनस्विनीला आहे. भाषा माणसानेच तयार केली, तीसुद्धा बदलली. भाषा म्हणजे वर्णाक्षर नाहीत तर भाषेतून प्रतीत होणारा अर्थ तोच ठेवून वाक्य रचना बदलण्यात केलेली हुशारी! दोन नकार वापरून होकार आणि होकारार्थी नकार देणे सर्वमान्य झाले आहे. भाषेचा वापर बदलला आहे.

कोणालाही चांगल्याची संवय लागली की दुसरं काहीच पसंतीला येत नाही. मग मुंबई-लंडनसारखी सुखसोयीयुक्त शहरेही त्याला अपवाद नाहीत. 'चक्रव्यूह' कवितेत याचेच वर्णन मनस्विनी करते. तेथील विविध जमातींची, विविध राज्यातील माणसं तिथं रमतात आणि त्यातही त्यांचा 'दर्ज्या' दिसतो. कोणी चांगल्या विचारांचा तर कोणी मोही दुष्ट अशा हीन दर्ज्याची माणसं तिला भेटतात. तिच्या मनातील प्रश्र्नाचं उत्तरही तिला मिळतं.

देशातील परिस्थिती समाजाच्या मनोवृत्तीतून जाणवते. उलट दिशेला समाज वाहतोय याची कल्पना मनस्विनी पवित्र गंगानदी उलट हिमालयाकडे कशी वहाते आहे हे 'हिमालयाकडे गंगा' कवितेत सादर करते. 'जीवन गौरव पुरस्कार' या कवितेत ही व्यथा प्रकर्षाने जाणवते.

'काळ बदलला' आहे - काळ बदलला हे कवितेचे नाव आहे. स्त्रियांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला आहे पण मुलगी, पत्नी, आई म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्याबद्दल मोठ्ठा सवाल तिच्यापुढे आहे. नोकरी, घर आणि त्यानुसंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिला आपली कर्तव्ये टाळून भागणार नाही उलट अधिक जबाबदारीनं वागावं लागेल. नवयुवकांना सहज मिळणारा पैसा योग्य कामी लावायला पाहिजे ही अनुभवी मनस्विनीची शिकवण आहे. प्रत्येकानं आपले आयुष्य कर्तव्यपूर्ती करूनच सुखी व समाधानी करावं ही मनस्विनीची कळकळ आहे.

'भन्नाट शहर' ही मार्मिक कविता अर्थपूर्ण वाचली तर त्यातील गर्भित अर्थ अधिक चांगला समजेल.

मनस्विनीला आधुनिक मुला मुलींकडे जबाबदार नागरिक म्हणून पहाताना पडलेला प्रश्र्न, विवध उदाहरणांने मांडला आहे आणि शेवटी आधुनिकता कशात दिसते तेही स्पष्ट लिहिले आहे. समाजातील हा मोठ्ठा वर्ग कान देऊन ऐकेल याची तिला खात्री आहे. सत्य जरी बोचर, कटूच अस तरी ती ते उघडपाने बोलली आहे. सर्वच लोकांना पैसा झटपट नि खूप हवा आहे. त्यांची मनोधारणा कमालीची बदलली आहे. त्यासाठी नीती-अनीतीच्या पुसट रेषा ते सहज हलवतात. 'परीक्षा' मधील मुलीचा choice याचं उदाहरण आहे. यातूनच पुढे त्यांच्याच बाल-गोपालांची 'परवरीश' करताना चुका घडतात आणि वेळ निघून गेल्यावर आत्मचिंतन व पश्र्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही.

आजचे राजकारणी धंदा म्हणून राजकारण करतात, संधीचा फायदा उठवतात. जुनी देशभक्ती त्यांच्यात दुरूनही अनुभवाला येत नाही. 'राजकारणी व्यवहार' मध्ये मनस्विनी त्यावर जोरदार टीका करताना दिसते.

वृद्धांना सन्मान देणे ही भारतीय संस्कृती आहे. याचा आधार घेऊन केलेल्या 'ठराव' कवितेत तरुण पिढीच्या वागण्यातून परस्पर विरोधी प्रतिक्रिया ती अनुभवते. समाजाचे झालेले 'विदारक रूप' ती टिपते. देशाच्या केल्या गेलेल्या धुपेनंतर तेथील माणसं कशी अधिक कृपण झाली आहेत हे तिला जाणवतं. मनाच्या अस्थिर अवस्थेत ती प्रश्न विचारते आपले संस्कार कुठे हरवले? या मनोवृत्तीचे किळसवाणे रूप पाहून मनस्विनी स्वतः वर खूप चिडली आहे आणि तिने त्या मनोवृत्तीला 'ठेचा लवंगी मिरचीचा' चाखवला आहे. कुणाचीही भाडभीड न ठेवता एका झुंजार मनस्विनीचा अवतार इथे दिसतो.

या सर्व कवितांचा आस्वाद घेण्यास 'अनुभूति' काव्य संग्रह जरूर वाचा आणि facebook वर अभिप्राय कळवा.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869


No comments:

Post a Comment