Friday 29 May 2015

अनुभूति: मी feeling बद्दल


मनस्विनी ज्या प्रसंगाचा, व्यक्तीचा विचार करते त्यांत ती स्वतः ला डूम्बवते ही तिची समर्थता, विशेषता. वाचकांना तो तिच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग भासतो. 'मी' भोवती फिरणाऱ्या तिच्या कविता 'मी हसले', 'अविस्मरणीय', 'भित्री' . स्वतः बद्दलचे, स्वतःशीच केलेले dialogues आहेत. हंसरी माणसं सर्वांनाच आवडतात. गंभीर स्वभावांच्या लोकांना दूर ठेवलं जातं. मनस्विनीला या गाम्भिर्यातही सौंदर्य दिसतं.

कोणती ही जबाबदारी म्हटलं की जोखीम आलीच. त्यासाठी स्वतःच्या मनाची घडण कशी करायला पाहिजे, हे ती सांगते. आईची जबाबदारी आणि महत्त्व तिच्या तोंडून निघते. 'मी' आणि 'ऋणानुबंध' हे न उकलणार कोडं (प्रेम) तिला विचार करायला लावतं. इथे वाचक बुचकळ्यात पडतो. 'स्वप्नातील स्वप्न'ची उकल ती फारच वेगळ्या गोष्टीने करते तेव्हा मजा वाटते. 'शेतकरी' आणि 'शेतकरी मी' किंवा 'गुंता विचारांचा' आणि 'क्षणिक जीवन जगायला' या कवितांत सत्याची उकल आहे. खरोखरीचा सूक्ष्म विचार केला तर आपल्या मनाचीही उलाघाल मनस्विनीच्या मनाच्या उलाघालीपेक्षा वेगळी होत नाही. एवढी ती मनःपूर्वक रंगवते आणि सत्य सहज समजते.

ती एक स्त्रीच आहे. भावना तिच्या जीवनाचा आधार आहे. 'ध्यास माझ्या मना' या कवितेत हे दिसते. तिला वेदना होतात, त्या न समजलेल्या प्रेमाच्या भावनांच्या! या कवितेत ती प्रेमाची व्याख्या करते, सार सांगते आणि मार्गही दाखवते. तिला आकलन झालेले जगातील सत्य सांगताना ती स्वतः ला समजावते की पुन्हा उभारी धर, प्रेम गवसेल. ते अमीट आहे.

स्वप्न ही खरं तर सामान्य गोष्ट. बहुतेकांना त्याचा अनुभव आहे पण मनस्विनीला नाही. तो मिळावा ही तिची साधी आशा पण ती पुरी झाली नाही म्हणून ती रडत नाही तर न पडलेल्या स्वप्नांचं नातं स्वतःच्या यशाला देते. किती वेगळी कल्पना?

तरुण वयात अनेकांच्या सुवर्णसंध्या विनाकारण हुकतात. अशीच हुकलेली संधी अचानक तिला मिळते. 'स्थलांतर' या कवितेत तिचा आशावाद व हुरूप आपण कवितेतच वाचा. वृद्धावस्थेकडे झुकून 'देई रे विसावा' असे सृष्टीकार्त्याला विनवते त्यावेळी तिला 'संभ्रम' पडतो यात ती चमचमती दुनिया, चमकणारे तारे आणि तरुणांच्या झालेल्या गैर समजुती यांची सांगड घालते आणि अधिकार वाणीने म्हणते सन्मान मागून मिळत नाही कर्तृत्व ते खेचून आणतं.

या सर्व कवितांमधील आत्मीयता वाचकाला वेगळ्या स्थरावर नेवून ठेवते. मी feeling हा जणू या कविता संग्रहाचा आत्माच आहे. self discoveryच्या तुमच्या प्रवासात मनस्विनीला तुमची जोडीदार करा आणि 'अनुभूति' संग्रह जरूर वाचा.


 

No comments:

Post a Comment