Tuesday 26 May 2015

अनुभूति: बोध


मनस्विनीच्या विचारात नि कल्पनाशक्तीत विविधता तर दिसतेच, त्याखेरीज 'अजून काहीतरी' जाणवतं. जगाच्या बऱ्या-वाईट अनुभवातून काहीतारी बोध ती आपल्याला घ्यायला सांगते . पुन्हा पुन्हा त्या शक्तीला, की जी आपल्या आयुष्याचा मोठा भाग आहे, त्याला विसरू नका. वळणावळणाने, अनेक कवितेतून, अनेक प्रकारानं ती आपल्या आत्म्याची उन्नती, प्रगती, मुक्ती करण्याच्या ध्येयाची आठवण देते. कधी आई, कधी मैत्रिण तर कधी teacher बनून ती आपली भूमिका निभावताना दिसते.

'आत्म्याचे स्वगत' या कवितेत भूतलावर तिला दिसलेले मार्ग ती सांगते आणि योग्य मार्गानेच तू जा असे सुचवते. माणसाने केलेली हुशारी ती नमूद करते आणि शेवटी व्यवहारी जगाची रीत दाखवून, निर्गुण निराकाराला न विसरण्याचा सल्ला देते - तुम्हा आम्हाला नाही, स्वतःच्या आत्म्याला! अनेक वेळा आपल्या शब्दांचा अनर्थ होत असतो. लहान मुलं तर या बाबतीत कोवळीच आहेत. आई का रागावली हे न कळणाऱ्या छोट्याश्या मुलाला ती समजावते, एवढेच नाही, तू कुठे चुकतो आहेस हे कल्पक गोष्टीतून त्याला युक्तीने सांगते, 'अर्थ लावू या शब्दांचा' या कविते द्वारे.

'भाग्यवान' कुणाला म्हणायचा यासाठी ती स्वतःच्या लहानपणीची आठवण सांगून, आज भाग्यवान कुणाला म्हणायचं याचं विश्लेषण करते. भारतीय संस्कृती, आदर - मग तो विद्येचा असो, अनुभवी व्यक्तींचा असो, वृद्धांचा असो - करायला सांगते / शिकवते. दोन माणसं एकत्र आली की वाद-विवाद, भांडणं हे गृहीतच आहे, याचं प्रतिबिंब म्हणजे 'छत्तीस नको त्रेशष्ठ हवे' आहे. वडीलधाऱ्यांनी आपल्या मुला मुलींशी कसं वागायला हवं, मार्गदर्शन करायला हवं आणि तरीही त्यांचा आत्मसन्मान न दुखावता! कारण, हे नातं पूर्व जन्मीचं असलं तरी या जन्मी पृथ्वीवर प्रत्यक्षात येणारं आणि नितळ प्रेमाचं आहे, हे ती मानते.

माणसाला 'मर्यादा' आहे, ती त्याने ओलांडायची नाही कारण ती विश्वचालकाच्या व्यवस्थापनाखाली आहे. याच जाणीवेतून श्रद्धा निर्माण होते आणि अज्ञानाने अंधश्रद्धेत रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. हे मनस्विनी 'नको अंधश्रद्धा' कवितेत सांगते. माणसाला होणारा मोह, त्याचे संस्कार धुवून टाकतात हे 'मोह की संस्कार' या कवितेत आपणच वाचा. मोह हा वैयक्तिक आहे. त्यातूनच चांगल्या चांगल्या गोष्टींचे कसे 'तुकडे तुकडे' उडतात या कवितारूपाने मनस्विनी एक बोध देण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही चांगल्या कामाचे / कर्माचे फळ उत्तमच असते. याची जाहिरात न करता ही नियती त्याची नोंद करत असते व त्याचे फळ न सांगता तुमच्यापर्यंत पोहोचवते. समाजात अनेकदा येणारा अनुभव असा आहे की तुमच्याजवळ जे नाही तेच नेमके समाजाला हवे असते. म्हणून 'प्रयत्न का वृथा?' असे मनस्विनी विचारते. प्रत्येक जीव वेगवेगळ्या कार्यासाठी, त्याच्या कर्मानुसार जन्माला येतो असे संस्कृती मानते, मनस्विनी जाणते. एका वेगळ्याच गणिती पद्धतीने तिने 'समाजाचे गणित' मांडून ते सोडवले आहे. समाजाचे सर्वमान्य नियम पाळण्याचा बोध तिने दिला आहे.

अति गर्व करणाऱ्या स्वतःला अत्यंत शहाणी समजणाऱ्या वृद्धेला एक 'मच्छर' कसा धडा शिकवतो. किरकोळ शत्रूला ही दुर्लक्ष्यू नका हा मनस्विनी बोध देते.

व्यक्तिव्यक्तीची 'मानसिकता' अलग अलग आहे. समाजानं कितीही प्रयत्न केला तरी ती बदलणं अवघड आहे हे तिला जाणवतं. मुला मुलींच्यातील केलेला फरक हे याचेच एक उदाहरण आहे. कोणत्याही ग्रंथाचे किंवा गोष्टींचे नुसतेच वाचन नसावे हे 'नको पारायणे व्यर्थ' या कवितेत दिसते. प्रयत्नपूर्वक केलेलं कोणतं ही काम आपल्याला चांगलच देऊन जातं, यावर मनस्विनीचा दांडगा विश्वास आहे. घंटा वाजवत, देवळांना भेटी देत, यात्रा करत फिरण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलं विहित कर्म मनापासून करण्याचा बोध तिनं घेतला आहे.

फार पूर्वेकडील त्सुनामीन घातलेला गोंधळ तिनं पाहिल्यावर, निसर्ग हाच खरा मोठ्ठा शिक्षक आहे याची तिला खात्री झाली. तिच्या मनावर खोल कुठेतरी याचा आघात झाला. तिच्या मनावर दडपण आलं. माणसानं कितीही हुशारी केली तरी त्याची 'अवकात' किती हे तिच्या लक्षांत आलं. आपल्याला निर्माण करणारी शक्ती (परमेश्र्वर) किती श्रेष्ठ आहे हे ती अनुभवते. येथल्या प्रत्येकाच्या मूळांचं गूढ तिला सुटत नाही म्हणून ती 'त्या' शक्तीला प्रणाम करते.

'अनुभूति' मधील विविध कवितेतून काहीना काही बोध मिळतो. त्या बोधाचा आपणही विचार कराल असा तिचा विश्वास आहे. तर चला वाचू अनुभूति - एक आगळा कविता संग्रह. Facebook वर कॉमेंट्स जरूर लिहा.


 

No comments:

Post a Comment