Friday 22 May 2015

अनुभूति: निरीक्षणाबद्दल


नमस्कार!
'निरिक्षण' मग ते कश्याचेही असो, मनस्विनीची एक शक्ती आहे. तिचे निरिक्षण सूक्ष्म - प्रदीर्घ आहे आणि ते ती आपल्या कल्पनेत चपखल बसवते. बहुतेक छोट्या मुलींना बाहुलीचं वेड असत. त्या तिच्यावर जीवापलिकडे प्रेम करतात, त्यांना जपतात. मनस्विनीची 'बाहुली' हे तिच्या मैत्रिणीचे रूपक आहे आणि ती तिच्याशी रममाण होते. स्वातंत्र्य की पारतंत्र्य आवडतं असा सरळ प्रश्र्नच ती विचारते. मनस्विनी अबोल आणि आपल्यातच रमणारी असली तरी तिला खूप हसायचं आहे. म्हणून ती सर्वांना 'मला आवडतं' मध्ये सांगते मला हसायला शिकावा. अशा subtle भावनांचा संबंध मानसिक अवस्थेच्या निरीक्षणाशी आहे. तिचं जीवन 'निर्मल जलधारा' सारखे नितळ आहे हे ती जाणीवपूर्वक आग्रहाने सांगते. तिला पहाटेचा एकांत आणि निरव शांततेत फिरायला आवडते.

जगात अनेक छोटी छोटी गावं विखुरलेली आहेत की जिथे निसर्गाचा अनोखा नजारा तिला मोहवतो. 'गांव' ही कविता अश्याच एका निसर्ग-सुंदर गावाचं निरीक्षण आहे. ती जेव्हा 'सुख' या कल्पनेत रमते, तेव्हां सुख स्वतःमध्येच असतं याची तिला चाहूल लागते आणि त्या दृष्टीने तिचे निरीक्षण वाढते. तिच्या आयुष्यात प्रेम हे तिला न गवसलेला बिंदू आहे तरीही या भावनेचे सूक्ष्म निरीक्षण ही त्रुटी भरून काढते. ऐन तारुण्यात प्रत्येकाला याच प्रेमाच अर्थ कधी न कधी कळतो - कुणी त्यात रमतो तर कुणी वेडा होतो, पण मनस्विनी हे अंत:करणातील प्रेम कर्ता आणि क्रियापद अशा दोन दोन शब्दात, पाल्हाळ न लावता अगदी सहजपणे मांडते.

मनस्विनी जेव्हा आईच्या भूमिकेत जाते, तेव्हा ती आपल्या चिमण्याला 'आशीर्वादाष्टक' म्हणते नि 'आई अजाण बालकाची' होऊन त्यानं नकळत तिला दिलेल्या आनंदाचं detailed वर्णन करते. पक्षांच्या आवाजाचं - भाषेचं वर्णन करून त्यांना बाळाचे मित्र करून टाकते - 'मित्रा' हे बालगीत अडीच तीन वर्षांची, नुकतीच बोलायला लागलेली मुलं सहज आत्मसात करतात.
मानास्विनीच्या सर्वच कविता निरीक्षणात्मक आहेत तरी ह्या निरीक्षण category तील कवितां मध्ये निरीक्षण आणि कल्पना यांचं अप्रतीम मिश्रण आहे. छोट्यांच्यात छोटं होणं तिला सहज जमतं, म्हणूनच त्यांना आवडतील असे विषय आणि शब्द ती वापरते. आईच्या भूमिकेतून मातृत्वाचे समाधान ओत:प्रोत भरलेले दिसते. व्यवहारी जगापेक्षा निसर्गाची ओढ तिला लागलेली दिसते. तिच्या कल्पनेची तरलता या सर्व निरीक्षणातून लिहिलेल्या कवितांमध्ये जाणवते.

रसिक वाचकांनो आपण तिच्या कल्पनांच्या जेवढे जवळ जाल तेवढी तिची ओळख आपल्याला होईल. यासाठी 'अनुभूति' संग्रह वाचा आणि त्यातील तुमच्या आवडी-निवडी कॉमेंट्सच्या रूपानं facebook वर लिहा. म्हणजे मला ब्लोग्स लिहायला खूप मजा येईल. पुन्हा भेटूया…

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869

No comments:

Post a Comment